साधारण महिनाभरापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही, असे बोलले जात होते. ‘आप’ने दिल्लीतील बराचसा जनाधार गमावल्याची चर्चा होती. मात्र, निवडणूकपूर्व सर्वेक्षणांच्या ताज्या अहवालांमध्ये ‘आप’ने जोरदार मुसंडी मारली असून, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षच पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.
याउलट हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत विक्रमी यश मिळवणाऱ्या भाजपला मात्र, दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागू शकते, असा अंदाज अनेक निवडणूक सर्वेक्षणांत वर्तविण्यात आला आहे.
यापैकी ‘इकॉनॉमिक टाइम्ससाठी -टीएनएस’तर्फे करण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत ‘आप’ला ३६-४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला मागील वर्षीप्रमाणे २८ ते ३२ जागांवरच विजय मिळू शकतो. या विधानसभा निवडणुकीत आपच्या एकूण मतांचा आकडा ४९ टक्क्यांवर पोहोचू शकतो, असा या सर्वेक्षणांचा कयास आहे. ‘आप’ची ही आत्तापर्यंतची सर्वोतत्म कामगिरी असेल. एकीकडे ‘आप’ आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस असली तरी काँग्रेस पुन्हा एकदा सुमार प्रदर्शनाचा पाढा गिरवताना दिसणार आहे. सर्वेक्षण अहवालांमध्ये काँग्रेसला अवघ्या २ ते ४ जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. तब्बल १६ मतदारसंघांतील ३,२६० लोकांच्या प्रतिक्रिया या सर्वेक्षणादरम्यान नोंदविण्यात आल्या होत्या.
‘एबीपी न्यूज- नेल्सन’च्या सर्वेक्षणातही ‘आप’ला तब्बल ३७ टक्के मतांसह विधानसभेच्या ३५ जागांवर विजय मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ३३ टक्के जनतेची मते भाजपच्या पारड्यात पडणार आहेत. समाजातील निम्न स्तरावरील व्यक्तींकडून आम आदमी पक्षाला सर्वाधिक पाठिंबा मिळणार असून, यामध्ये राखीव जाती आणि मुस्लिम जनतेचा समावेश आहे.
‘हिंदुस्थान टाईम्स- सी फोर’ यांच्या सर्वेक्षणातदेखील ‘आप’ आणि भाजप यांच्यातील स्पर्धेत ३६ ते ४१ जागांवर विजय मिळवून ‘आप’ बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तब्बल ४६ टक्के जनता अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे भाजपचा किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय साफ चुकलेला दिसत आहे.