News Flash

केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या कपिल मिश्रांची ‘आप’मधून हकालपट्टी

केजरीवालांनी मंत्र्याकडून २ कोटी घेतल्याचा आरोप केला होता

आप नेते कपिल मिश्रा (संग्रहीत छायाचित्र)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्या कपिल मिश्रा यांची आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘आप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत मिश्रा यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर अडचणींचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाने रविवारी पुढचा अंक गाठला होता. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी थेट केजरीवालांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातून निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे.

कपिल मिश्रा यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे असा आरोप करत मिश्रांनी खळबळ उडवून दिली होती. केजरीवाल मंत्रिमंडळात काम करताना अनेक गैरप्रकार आढळून आले. याबाबत मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना निवेदन दिल्याचे मिश्रांनी म्हटले होते. केजरीवाल आता पूर्वीसारखे राहिले नसून मुख्यमंत्री पदाने त्यांना बदलले आहे असे मिश्रा यांनी म्हटले होते.

आपने कपिल मिश्रांचे आरोप फेटाळून लावत मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिल मिश्रा यांनी रविवारीच भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले होते. सोमवारीदेखील मिश्रा यांनी आपवर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यावर मला धमक्यांचे मेसेजेस आणि कॉल येत आहेत. माझी पक्षातून हकालपट्टी करुन दाखवा असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी भाजप आणि नरेंद्र मोदींचा विरोधक असून मी भाजपची भाषा बोलत असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे मिश्रांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी सकाळी सीबीआयकडे तक्रार करणार असून सीबीआयसमोर प्रत्यक्ष साक्षीदारही हजर करु असे मिश्रांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 9:00 pm

Web Title: aam aadmi party pac suspended kapil mishra from party satyendar jain arvind kejriwal
Next Stories
1 मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा आता इफ्तार पार्टीमधल्या बीफसेवनाला विरोध
2 …तर पाकमध्ये घुसून हल्ला करणार; इराणचा इशारा
3 धक्कादायक! जम्मू काश्मीरात दगडफेकीसाठी विद्यार्थ्यांना दिले जातात पैसे
Just Now!
X