आम आदमी पार्टीतील (आप) चार उच्चपदस्थ नेत्यांनी मंगळवारी ज्येष्ठ  नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि शांतीभूषण या पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढविल्याने पक्षांतर्गत संघर्ष अधिकच खालच्या थराला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली  विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव होण्यासाठी यादव आणि भूषण पितापुत्रांनी काम केले आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला आहे.
दिल्ली आपमधील संघर्ष चव्हाटय़ावर आल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, परिवहनमंत्री गोपाळ राय, पक्षाचे सरचिटणीस पंकज गुप्ता आणि संजय सिंह यांनी यादव आणि भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आल्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. हे चारही नेते अरविंद केजरीवाल यांचे समर्थक आहेत.
आम आदमी पार्टीचे (आप) नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पक्षातील घडामोडी अधिकच वेगवान झाल्या आहेत.
पक्षाच्या नेतृत्वाने दिल्लीतील आमदारांकडून भूषण आणि आपल्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जबरदस्तीने सह्य़ा घेतल्याचा आरोप यादव यांनी केल्याने पक्षांतर्गत संघर्ष पेटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.