अरविंद केजरीवाल यांचा शुक्रवारी दौरा
दिल्लीत वर्षभर सत्ता राबवल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पावले पंजाबकडे वळू लागली आहेत. पठाणकोटमधील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांची  अरविंद केजरीवाल १३ जानेवारीला भेट घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त १४ जानेवारीला  आम आदमी पक्षाने मोठी सभा आयोजित केली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल आत्तापासून सक्रिय झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर  आम आदमी पक्षाने रणनीतीत बदल केला होता. सर्वच राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याऐवजी दिल्लीनजीक असलेल्या राज्यांवर केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
याच रणनीतीचा भाग म्हणून केजरीवाल पठाणकोटला जाणार आहेत. पंजाबमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंमली पदार्थ सुळसुळाट झाल्याचा आरोप सातत्याने आम आदमी पक्षाचे नेते करीत असतात.  त्यामुळे  युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधिनता आदी मुद्दय़ांवर केजरीवाल आपल्या भाषणादरम्यान भर देण्याची शक्यता आहे.
दिल्लीत सम-विषम प्रयोग, गृह सचिवांमार्फत राज्य सरकारचे नियम न पाळणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सामूहिक रजा, डीडीसीए प्रकरणावरून केजरीवाल सातत्याने केंद्राला आव्हान देत आहेत. दिल्ली पालिका निवडणुकीसाठीदेखील आतापासून तयारी सुरू झाली आहे.  वेळप्रसंगी आम आदमी पक्ष पंजाबमध्ये काँग्रेसशी युती करण्याचा विचार करेल, असा दावा पक्षसूत्रांनी केला.