जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात देशभरातून दिल्लीनजीकच्या पलवलमध्ये एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चास ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारपासून सुरुवात झाली. येत्या सोमवारपासून स्वत अण्णा हजारे जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करणार आहेत. अण्णांसमवेत दिल्लीत प्रचंड बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेला आम आदमी पक्ष सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात जमीन अधिग्रहण कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याची तयारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दर्शवली असली तरी त्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवावी लागेल, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रातील भाजप सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याची व्यूहरचना आम आदमी पक्षाने आखली आहे.
‘भूमी अधिकार चेतावनी सत्याग्रह’ या नावाने आयोजित आंदोलन अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पलवलमध्ये सुरू झाले. या आंदोलनात दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील शेतकरी सहभागी झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे शेतकरी दिल्लीत जंतरमंतरवर सरकारविरोधात निदर्शने करणार आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही
शेतकरी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहे.
अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम आदमी पक्षाला एक कार्यक्रम मिळेल, त्यामुळे या आंदोलनात सहभागी होण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुकूलता दर्शवल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. ‘आप’चे प्रवक्ते दिलीप पांडेय यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, अण्णांची परवानगी असेल तरच आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ. अर्थात हरयाणा पंजाबमध्ये जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे आंदोलन करणार आहे. मात्र २३ फेब्रुवारीपासून अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागावर ‘आप’कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

२६ फेब्रुवारीला ‘आप’ची बैठक
आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीत २६ फेब्रुवारीला होत आहे. दिल्लीप्रमाणे देशभरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी कोणती रणनीती आखावी लागेल यावर या बैठकीत पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत. देशभरातील पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीपूर्वी पक्षाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे.