News Flash

‘अतुल्य भारत’ मोहिमेतून आमिर खानची गच्छंती!

नव्याने निविदा मागवून करार केला जाईल, असेही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले.

| January 7, 2016 11:38 am

आमिर खान -Amir Khan

करार संपल्याचा पर्यटन विभागाचा दावा; मोहिमेला नवा सदिच्छादूत लाभण्याची शक्यता

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप केल्याने काही महिन्यांपूर्वीच अनेक केंद्रीय मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या आमिर खानची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून बुधवारी गच्छंती झाली आहे. अर्थात या मोहिमेचा करार संपल्याचा दावा करीत गरज पडेल त्यानुसार नव्याने निविदा मागवून करार केला जाईल, असेही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले.

केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले की, ‘अतिथी देवो भव’ या मोहिमेसाठी मॅक् कॅन वर्ल्डवाइड या एजन्सीशी पर्यटन विभागाने करार केला होता. या एजन्सीने आमिर खानला पर्यटन सदिच्छादूत म्हणून निवडले होते. पर्यटन विभागाने नव्हे. मॅक् कॅनशी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात दोन कोटी ९६ लाख रुपयांचा हा करार झाला होता. तो आता संपुष्टात आला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

माहिती अधिकारातून मागितलेल्या संदिग्ध उत्तरामुळे आमिर या मोहिमेत आहे की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. तिला पूर्णविराम देताना शर्मा म्हणाले की, आमिर पर्यटन विभागाचा सदिच्छादूत नाही.

मॅक् कॅन वर्ल्डवाइडचे प्रमुख प्रसून जोशी यांनीही करार संपुष्टात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला.

नव्याने चाचपणी?

‘अतिथी देवो भव’ मोहिमेसाठी आमिर खान ऐवजी नवा चेहरा निवडला जाण्याची शक्यता पर्यटन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. पर्यटन विभागातील विपणन आणि संशोधन गट त्यादृष्टीने चाचपणी करीत असल्याचेही सांगण्यात आले.

वक्तव्य भोवले?

देशातले वातावरण बिघडल्याने आपल्या मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आपण देशाबाहेर जायचे का, असा प्रश्न पत्नी किरण रावने विचारल्याचे आमिरने दोन महिन्यांपूर्वी एका समारंभात जाहीरपणे सांगितले होते. त्यावरून समाजमाध्यमांतही जोरदार प्रतिक्रिया उमटली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 5:45 am

Web Title: aamir khan is no more a brand ambassador of atulya bharat
टॅग : Brand Ambassador
Next Stories
1 दुसऱ्यांदा भाजप अध्यक्षपदासाठी अमित शहा यांची पूर्वतयारी
2 अरविंद केजरीवाल व गृहसचिवांमध्ये पुन्हा शीतयुद्ध
3 पठाणकोट हवाई तळावर स्फोटकांचा शोध सुरूच
Just Now!
X