मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खानच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याने ‘दंगल’ चित्रपटाचे चित्रीकरण स्थगित करून मुंबईकडे धाव घेतली. दंगलच्या चित्रीकरणासाठी आमीर खान गेल्या जवळपास ४० दिवसांपासून लुधियानामध्ये आहे. मात्र, शनिवारी चित्रीकरणावेळीच त्याच्या खांद्याला दुखापत झाली. प्राथमिक उपचारांनंतर तो पुढील उपचारांसाठी मुंबईमध्ये दाखल झाला आहे.
लुधियानामधील गुरूनानक स्टेडियममध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. शनिवारी ‘अॅक्शन’ दृष्ये चित्रीत केली जात होती. आमीर खानला कॅमेरासाठी वेगवेगळ्या बाजूने ही दृष्ये करून दाखवावी लागत होती. सातत्याने रिटेकही घ्यावे लागत होते. याच चित्रीकरणावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. सुरुवातीला आईसपॅकच्या साह्याने त्याच्या खांद्याला शेक देण्यात आला. मात्र, वेदना कमी होत नसल्यामुळे त्याला लुधियानातील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेथील उपचारांनंतर आमीरने पुढील उपचारांसाठी मुंबई गाठले.
दुखापतीमुळे दंगलचे चित्रीकरण काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 11:21 am