असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या अभिनेता आमीर खानला सध्या देशभरातून होत असलेल्या विरोधाचा फटका त्याने केलेल्या जाहिरातींच्या उत्पादनांनाही बसण्याची शक्यता आहे. ट्विटरवरील काही लोकांनी #AppWapsi हा हॅशटॅग वापरून एक आंदोलनच सुरू केले असून, आमीर खानने जाहिरात केलेल्या स्नॅपडीलवरून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन इतरांना केले आहे. त्याचबरोबर ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपडीलचे अॅप आहे. त्यांनी ते मोबाईलमधून काढून टाकावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी गूगल प्ले स्टोअरवर या अॅपला केवळ एक स्टार रेटिंग देण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.
‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने सोमवारी देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे आपण चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, संघटनांनी आणि सोशल मीडियावरील काही लोकांनी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्याला देश सोडून जाण्याबद्दलही काही जणांकडून सांगण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर आमीर जाहिरात करत असलेल्या उत्पादनांच्या कंपन्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आमीरवरील रोषाचा पहिला फटका स्नॅपडिलला बसला आहे. अनेकांनी ‘नो डिल विथ स्नॅपडील’ अशी प्रतिक्रिया मांडली आहे. त्याचबरोबर हे अॅपही मोबाईलमधून काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.