पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाराणसीमध्ये देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनही घेतलं. यावेळी छान रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नदीच्या किनाऱ्यावर उभे असून समोर मंदिरांना केलेली रोषणाई दिसून येत आहे. भगवान शंकराचे कौतुक करणारं गाणं मोठ्या आवाजात वाजत असल्याचे ऐकू येत असून मोदींनी या गाण्याच्या चालीवर ठेका धरल्याचे दिसून येत आहे. मात्र आता याच व्हिडीओवरुन मोदी ट्रोल होताना दिसत आहे. आम आम आदमी पार्टीने या व्हिडिओमधील काही भाग एडीट करुन हा प्रकार म्हणजे २०२० मधील स्कॅम म्हणजेच घोटाळा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्कॅम १९९२ चं म्युझिक देत हा व्हिडिओ एडीट करण्यात आला आहे.

सॅमस्टर अशी कॅप्शन देऊन आपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोवर स्कॅम २०२० असं लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये दिल्लीमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या लाठीमार केल्याचे व्हिडीओ दिसत असून त्यासमोर मोदींनी ठेका धरल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही मोदींनी ट्विट केलेला व्हिडीओ रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तक् धिना धिन्! बाय बाय लाइट्स! भारत (देश) जळत असताना मोदींनी गाण्यावर ठेका धरलाय,’ अशी कॅप्शन भूषण यांनी या ट्विटला दिली आहे.

दरम्यान, सोमवारी मोदींनी करोनाच्या संकटातही काशीची उर्जा, भक्ती आणि शक्ती यांच्यात काहीही बदल झाला नाही. सगळ्या विश्वाला बळ देणारी काशी आहे असं वक्तव्य मोदींनी केलं आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर त्यांनी विश्वनाथ धाम या प्रकल्पाचा आढावाही घेतला. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक लोकांचं राहणीमान उंचावण्यालाही मदत मिळणार असल्याचे मोदी म्हणाले आहेत. काशीतले नागरिक हे देवाचं रुप आहे कारण ही देवाची भूमी आहे असंही मोदींनी म्हटलं. काशी ही संपूर्ण जगाला प्रकाश देणारी नगरी अशा शब्दांमध्ये मोदींनी काशीचे आणि काशीतील नागरिकांचं कौतुक केलं.