गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीत सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा अखेरीस सोमवारी सुटला. काँग्रेसने दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि जनमताचा घेतलेला कानोसा यांच्या बळावर आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे सादर केला. जंग यांनी ‘आप’चा प्रस्ताव राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे पाठवला आहे. गुरुवारी, २६ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७० सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसला आठ तर भाजप व आप यांना अनुक्रमे ३१ व २८ जागांवर विजय मिळवता आला. मात्र, त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. ‘आप’ने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतल्याने गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीतील राजकीय तिढा सुटला. सोमवारी सकाळी केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना भेटून ३६ विजयी उमेदवारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मात्र ‘आप’च्या निर्णयावर मौन धारण करणेच पसंत केले.  
‘आप’ने सत्ता स्थापन करावी की नाही यासाठी केजरीवाल यांनी थेट दिल्लीकरांनाच आवाहन केले होते. आम आदमी पक्षाच्या आवाहनाला पत्रक, फेसबुक, ट्विटर, संकेतस्थळ व दूरध्वनीवर मिळालेल्या प्रतिसादापैकी ७४ टक्के नागरिकांनी सत्तास्थापनेचा कौल दिला.  सत्तास्थापनेचा कौल जाणून घेण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत २८० चौक सभा घेतल्या, तर संकेतस्थळावर १६,१६५ नागरिकांनी मते नोंदवली.     

सत्तास्थापनेचा ‘आप’चा निर्णय मतदारांचा विश्वासघात करणारा आहे. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि सत्तास्थापनेसाठी त्यांचाच हात हातात घेणे हे योग्य नाही.
-हर्षवर्धन, दिल्ली भाजपचे नेते

सरकार स्थापण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ‘आप’चे अभिनंदन. मात्र, काँग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
-शीला दीक्षित, माजी मुख्यमंत्री

शपथविधी रामलीला मैदानावर
केजरीवाल यांनी नूतन सरकारचा शपथविधी जंतर-मंतरवर व्हावा अशी इच्छा नायब राज्यपालांकडे व्यक्त केली होती. मात्र, नायब राज्यपालांनी ती फेटाळून लावल्यामुळे आता २६ डिसेंबरला रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा होईल. नूतन सरकारमधील मंत्री शासकीय सुविधेचा लाभ घेणार नसल्याचे केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.