आम आदमी पक्षाच्या (आप) नव्या वक्तव्यामुळे दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने अरूण जेटली यांच्या अधिपत्याखाली डीडीसीएत होणारा भ्रष्टाचार जगासमोर आणल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. डीडीसीएचे कार्यकारी अध्यक्ष चेतन चौहान यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ‘आप’कडून हा दावा करण्यात आला. डीडीसीएमध्ये भ्रष्टाचार असता तर विराट कोहली भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून दिसला नसता, असे विधान चौहान यांनी केले होते.
विराट कोहलीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी वक्तव्य केले होते. दिल्लीच्या १४ वर्षाखालील संघात निवड होत नसल्यामुळे मी खूप निराश होत असे. दिल्लीतील सगळी व्यवस्था कशाप्रकारे काम करते हे तुम्हाला माहिती आहे.  वशिलेबाजीच्या माध्यमातून मला संघात स्थान मिळू शकले असते. माझ्या वडिलांना त्याबद्दल विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी लगेच नकार दिला. पुढच्याच वर्षी माझ्या कामगिरीच्या जोरावर मी दिल्लीच्या संघात स्थान मिळवले, असे विराट कोहलीने या मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
कोहलीच्या याच मुलाखतीचा धागा पकडत ‘आप’ने विराटच्या वडिलांसमोर तो प्रस्ताव ठेवणारा डीडीसीएचा पदाधिकारी कोण होता, असा सवाल अरूण जेटलींना विचारला आहे. कोहलीच्या वडिलांनी या सगळ्याला नकार दिला तेव्हा कोहलीला संघातून डावलण्यात का आले, भारताचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीचे आरोप तुम्ही नाकारणार का, असा सवालदेखील आपकडून जेटलींना विचारण्यात आला आहे.