सत्ता आपल्याला भ्रष्ट बनवू शकते हे माहीत असल्यामुळेच आम आदमी पार्टी दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हाणला आहे.
दिल्लीत सरकार स्थापन करण्याच आम आदमी पार्टी कचरते आहे, कारण सत्ता मिळाली की भ्रष्टाचार होतो असे त्यांना वाटते, असे पर्रिकर म्हणाले. फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी या संस्थेच्या गोवा शाखेतर्फे न्यायमूर्ती (निवृत्त) आर एम एस खंडेपारकर यांच्या नेतृत्वाखालील समारंभात ते बोलत होते.
जन लोकपाल विधेयक मंजूर व्हावे, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणासाठी बसले आहेत. त्याबाबत बोलताना पर्रिकर म्हणाले की, अण्णा हजारे यांनी समाजाची नस अचूक पकडली आहे, परंतु विधेयक मंजूर झाल्यामुळे समाजातील भ्रष्टाचाराचा चेहरामोहरा बदलता येणार नाही. लोकपाल विधेयक किंवा लोकायुक्त यामुळे भ्रष्टाचाराची समस्या सोडविता येणार नाही, असे मत पर्रिकर यांनी व्यक्त केले.  कर्नाटक राज्य सोडले तर अन्य कुठेही राज्यस्तरावर लोकायुक्तांचा काहीही परिणाम झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. लोकायुक्तांच्या स्थापनेनंतरही कर्नाटकातील भ्रष्टाचार कमी झाला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोव्यामध्येही लोकायुक्त स्थापन करून फारसा चांगला परिणाम झाल्याचे दिसत नाही, असे पर्रिकर यांनी सांगितले.