देशावर करोनासारखं मोठं संकट असताना राजकारण काही थांबताना दिसत नाही. दिल्लीतील केजरीवाल सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार हा वाद काय नविन नाही. अनेक वेळा हा वाद कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. आता करोना लसीकरणाच्या श्रेयावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे लसीकरणाबाबत दिल्लीत लागलेले बॅनर यासाठी निमित्त ठरलं आहे. भाजपानंही लसीकरणाचं श्रेय कुणाचं आहे?, यासाठी दिल्लीत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत.

दिल्लीतील आप सरकारनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावत ‘लस घेतली का?’, असा प्रश्न विचारला आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो आहे. दिल्लीतील भाजपाला ही बाब रुचली नाही. दिल्लीतील केजरीवाल सरकार काहीच करत नसताना लसीकरणाचं श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या विरोधात दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष राजीव बब्बर यांनी बॅनरबाजी करत उत्तर दिलं आहे. यात फक्त एक ओळ त्यांनी वाढवली आहे. “लस घेतली का? जी दिल्लीला पंतप्रधान मोदी यांनी मोफत दिली आहे”, असं त्या बॅनरमध्ये लिहिण्यात आलं आहे. हे बॅनर जिथे जिथे अरविंद केजरीवाल यांचे बॅनर लागले आहेत, तिथे तिथे लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टरवरून अरविंद केजरीवाल यांचा फोटो हटवण्यात आला आहे.


“मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीकरांना लस घेतली का?, असं विचारत आहेत. आम्ही त्यांचं श्रेय त्यांना दिलं आहे. फक्त पंतप्रधान ही लस मोफत देत आहेत असं नमूद केलं आहे.”, असं दिल्ली भाजपा उपाध्यक्ष राजीव बब्बर यांनी सांगितलं. तसेच दिल्लीतील आप सरकार राजकारणात गुंतलं असल्याची टीका केली आहे.