दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयाबाहेर बुधवारी भाजप आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दिल्ली पोलिसांनी ‘आम आदमी पक्षा’च्या १४ सदस्यांना ताब्यात घेतले आहे. या हाणामारीत २८ जण जखमी झाले असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आपच्या आशुतोष आणि शाझिआ इल्मी यांच्यावर  गुन्हे दाखल केले आहेत.
दंगल भडकावणे, सरकारी कर्मचा-यांना काम करण्यापासून रोखणे आणि जनतेच्या संपत्तीचे नुकसान केल्याच्या आरोपांखाली आशुतोष आणि शाझिआ इल्मी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या  ‘आप’ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणखी काही नेत्यांवर गुन्हे दाखल  करण्यात येणार असल्याचेही पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.  
भाजप कार्यालयाबाहेर हाणामारीच्या प्रकारानंतर पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित जणांना प्राथमिक चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे. या सर्वांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 

गुजरात दौऱयावर दाखल झालेले आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना परवानगी शिवाय रोड शो केल्याने चौकशीसाठी गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना लगेच सोडूनही देण्यात आले होते. केजरीवालांना ताब्यात घेतल्याने दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर ‘आप’ कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी राडा घातला होता. 
दिल्लीत झालेल्या राड्यानंतर आता ‘आम आदमी पक्षा’कडून भाजपविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘आप’चे मिडीया समन्वयक दिपक बाजपेयी यांनी दिली आहे. ‘आप’मधील पक्षांतर्गत चर्चेनंतर भाजप समर्थकांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.