आपल्या कार्यकाळात झालेले घोटाळे लपवण्यातचे आम आदमी पक्षाचे सरकार गुंतले असून, त्यांना दिल्लीच्या प्रश्नांची काहीही देणेघेणे नाही, असा हल्ला सोमवारी भाजपने ‘आप’वर चढवला. दिल्लीतील आपचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आर. पी. सिंग यांनी आपवर जोरदार टीका केली. जर घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हायची त्यांची इच्छा असेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
सिंग म्हणाले, जर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. पण ते तसे करणार नाहीत. त्यांना केवळ नाटकं करण्यातच रस आहे. दिल्लीतील जनता त्यांच्या या नाटकांनी त्रस्त झालीये. दिल्लीमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे असताना त्यांच्याशी ‘आप’ला काहीही देणेघेणे नाही. केलेले घोटाळे लपवण्यातच त्यांचा वेळ निघून चाललाय, असेही ते म्हणाले.आपचे नेते विनाकारण केंद्र सरकारशी भांडण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
आपचे नेते घोटाळ्यांमध्ये आकंठ बुडाले आहेत. पुढील काळात पोलीस त्यांची चौकशी करणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच स्वतःला वाचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. ४०० कोटी रुपयांचा जलबोर्ड घोटाळा आणि ३०० कोटी रुपयांचा नंबरप्लेट घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे, असेही सिंग यांनी सांगितले.