दिल्लीमध्ये सत्तारुढ असलेल्या आम आदमी पक्षाला इतर राज्यात विस्तार करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी आपने २०८ जागांवर उमेदवार उतरवले होते. यातील बहुतांशी उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही. राज्यात आपला अवघे ०.७ टक्के मते मिळाली. तर १.५ टक्के मतदारांनी नोटा हा पर्याय स्वीकारला.

मध्य प्रदेशमध्ये आपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून घोषित केलेल्या आलोक अग्रवाल यांना फकत ८२३ मते मिळाली. नर्मदा बचाओ आंदोलनाचे सदस्य अग्रवाल यांनी भोपाळ दक्षिण पश्चिम मतदारसंघातून नशीब आजमावले होते. आपने ९० सदस्य असलेल्या छत्तीसगडमधील ८५ जागांवर, तेलंगणानातील ११९ जागांपैकी ४१ तर २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये १४२ उमेदवार उभे केले होते.

छत्तीसगडमध्ये आपला ०.९ टक्के आणि राजस्थानमध्ये मात्र ०.४ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. आपला मिळालेल्या मतांची टक्केवारी नोटापेक्षाही कमी आहे. यामुळे आपच्या विस्तार योजनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

दिल्लीबाहेर पंजाब वगळता आपला इतर राज्यात आपले अस्तित्व दाखवण्यात म्हणावे तितके यश आलेले नाही. पंजाबमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवूनही मुख्य विरोधी पक्ष म्हणून त्यांचा पक्ष समोर आला आहे. निवडणुकीत आम्ही स्वत:ला भाजपा आणि काँग्रेससारखे सादर केले नव्हते. सर्व सत्तास्थानं असलेल्या भाजपा आणि काँग्रेसशी आमची तुलना आम्ही करत नाही, असे अग्रवाल यांनी म्हटले.