दिल्लीतील आम आदमी पार्टीकडून (आप) आपला छळ करण्यात येत असल्याचा आरोप दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंग यांनी केला आहे. दिल्लीचे वादग्रस्त विधिमंत्री सोमनाथ भारती यांनी दक्षिण दिल्लीत एका ठिकाणी टाकलेल्या छाप्याबद्दल त्यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे आपला छळ होत असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आपण आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही नकार दिल्याने आपला छळ होत आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे.
युगांडातील एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी भारती यांचे वकील त्यांच्या वतीने आयोगासमोर हजर राहण्यासाठी आले असता सिंग आणि वकिलांमध्ये जाहीर खटका उडाला. बरखा सिंग या काँग्रेसच्या माजी आमदार आहेत. आर के पूरम मतदारसंघातून त्या निवडणुकीत पराभूत झाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी आपण वैधानिक पदावर असल्याने राजीनामा देण्याची गरज नाही, असे सिंग यांचे म्हणणे आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अवतारसिंग लवली यांनी शासकीय मंडळे आणि आयोगावर असणाऱ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पदांचे राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. मात्र आपण वैधानिक पदावर असून त्याची मुदत संपण्यास अद्याप एक वर्ष आणि चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, असे सिंग म्हणाल्या.
युगांडातील महिलेच्या घरावर मध्यरात्री छापा टाकून त्यांचा छळ केल्याप्रकरणी आपण भारती यांना आयोगासमोर पाचारण केल्याने आप सरकार आपला छळ करीत असून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला. अवतारसिंग लवली यांनी आपले आदेश मागे घेतल्याचे सिंग यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मैत्रेयी पुष्पा?
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मैत्रेयी पुष्पा यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस दिल्ली सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बिगर राजकीय, प्रसिद्ध क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आश्वासन ‘आप’ने दिले होते. त्यामुळे मैत्रेयी पुष्पा यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती यांनी दक्षिण दिल्लीतील एका ठिकाणी टाकलेल्या छाप्याप्रकरणी भारती यांना आयोगासमोर पाचारण करून आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा बरखा सिंग या प्रश्नाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप सरकारने केला आहे.