‘आप’चे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. एका बांधकाम व्यावसायिकाकाडून लाच मागत असल्याची खान यांची ऑडिओ क्लिप खान त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशी अंतर्गत समोर आली. तिची चौकशी केल्यानंतर खान यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवालांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचेही केजरीवालांनी जाहीर केले. खान यांची हकालपट्टी केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आपचे आमदार इमरान हुसैन यांची नियुक्ती करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
असीम अहमद खान यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील एका बांधकाम व्यावसायिकाचे काम थांबवून ठेवले. काम सुरू करण्यासाठी खान यांनी व्यावसायिकाकडे लाच मागितल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. बांधकाम व्यावसायिक आणि खान यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेची ऑडिओ क्लिप देखील समोर आली. त्याची चौकशी केल्यानंतर आज खान यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केजरीवालांनी पत्रकारांना सविस्तर माहिती देताना सांगितले. दरम्यान, भाजपनेही आता याचप्रमाणे वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान यांचीही हकालपट्टी करावी अशी मागणी केजरीवालांनी यावेळी केली.