दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि नेते अरूण जेटली हे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप सोमवारी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी केला.
पत्रकार परिषदेत संजय सिंग म्हणाले, आम आदमी पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपचे नेते घाबरले आहेत. त्यामुळेच भाजपचे आणि कॉंग्रेसचे नेते दिल्लीतील आमच्या सरकारविरोधात कटकारस्थान रचत आहेत. दिल्लीतील ड्रग आणि सेक्स रॅकेटविरोधात या दोन्ही पक्षांचे नेते ब्र सुद्धा काढत नाहीत. मात्र, केजरीवाल यांच्यासरकारविरोधात सातत्याने लिखाण करीत आहेत. भाजपचे नेते अरूण जेटली यांनी केजरीवाल यांच्या सरकारविरोधात ब्लॉग लिहिला. मात्र, त्याच राज्यातील सेक्स रॅकेटबद्दल ते काहीच बोलले नाहीत. मोदी, जेटली आणि हर्ष वर्धन हे तिघेजण मिळून विनाकारण सरकारविरोधात कारवाया करीत आहेत.
दक्षिण दिल्लीमध्ये राज्याचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी टाकलेला छापा योग्यच होता, असेही संजय सिंग म्हणाले. छाप्यामध्ये कोणताही वर्णभेद करण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले.