आम आदमी पक्ष आणि नेते कुमार विश्वास यांच्यात सध्या जोरदार खटका उडाला आहे. आपचे नेते दिलीप पांडे यांनी कुमार विश्वास यांच्यावर अविश्वास दाखवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्याविरोधात नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. कवी विश्वास हे गद्दार आहेत. भाजपचे ‘यार’ आहेत, असा आरोप या पोस्टरद्वारे करण्यात आला आहे. गद्दार कुमार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विश्वास यांचे पितळ उघडे पाडणाऱ्या पांडे यांचे आभारही मानले आहेत.

भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांनी घेरलेल्या आम आदमी पक्षातील नेत्यांमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. अरविंद केजरीवाल आणि कपिल मिश्रा यांच्यातील वाद सुरू असतानाच आता कुमार विश्वास आणि पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्याची पहिली ठिणगी दिलीप पांडे यांच्या रुपाने पडली आहे. त्यांनी कुमार विश्वास यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधणारे कुमार विश्वास राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. विश्वास यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिक्षित यांच्यावर टीका केली होती. त्याचा आधार घेत पांडे यांनी विश्वास यांच्याविरोधात ट्विट केले होते.

विश्वास हे राजस्थानचे प्रभारी आहेत. नुकत्याच झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर वैयक्तिक टीका न करता सरकारविरोधात टीका करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. ‘महाराणी हटाव’ या अजेंड्यावर निवडणुका लढायच्या नसून पाणी आणि वीज अशा मुद्द्यांवर निवडणुका लढायच्या आहेत, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विश्वास यांच्या कार्यपद्धतीवर पांडे यांनी शंका उपस्थित केली होती.

कुमार विश्वास यांना गद्दार म्हणून संबोधलेले पोस्टर दिल्लीच्या पक्ष कार्यालयाबाहेर लागले आहेत.
कुमार विश्वास यांना गद्दार म्हणून संबोधलेले पोस्टर दिल्लीच्या पक्ष कार्यालयाबाहेर लागले आहेत.