छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये उंदरांनी त्रस्त केले. त्यामुळे भाजपाचा हा कट असल्याचा आरोप आपने केला आहे. तर भाजपानेही या आरोपावरुन सोमनाथ भारती यांच्यावर निशाणा साधला आहे.

दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आलेले सोमनाथ भारती विलासपूर येथील छत्तीसगड भवनातील व्हीआयपी रुममध्ये उतरले होते. मध्यरात्री उशिरा भारती यांना त्यांचे हात-पाय कुरतडले जात असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांना आजूबाजूला कोणी दिसले नाही. ते पुन्हा झोपी गेले. तेव्हा पुन्हा त्यांना शरीराचा चावा घेत असल्याचे जाणवले. या प्रकारामुळे भारती प्रचंड हैराण झाले होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, खूप रात्र झाल्याने कार्यकर्तेही झोपी गेले होते. त्यामुळे त्यांनी कोणलाा फोन केला नाही.

भारती यांना अखेर संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. खोलीत मोठ्या प्रमाणात उंदीर असल्याचे त्यांना सकाळी समजले. त्यांनी त्वरीत पक्ष कार्यकर्त्यांना बोलावणे धाडले आणि उंदरांना पकडण्याची मोहीमच सुरु केली. सोमनाथ भारती यांना रात्री सुमारे अर्धा डझनहून अधिक उंदरांनी चावा घेतल्याचे सांगितले जाते. भारती यांच्या औषधांचाही उंदरांनी फडशा पाडला. मोठ्या महत्प्रयासाने कार्यकर्त्यांना एक उंदीर पकडण्यात यश आले.

त्यानंतर त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. भाजपा स्वत: आमचा सामना करुन शकत नसल्याने त्यांनी उंदरांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला.

उंदरांच्या चाव्यामुळे त्रस्त झालेल्या भारती यांचे हाल पाहून भाजपानेही त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांचे असेच हाल होतात. उंदीरही त्यांना सोडत नाहीत, असा टोला भाजपाने ‘आप’ला लगावला. दरम्यान, छत्तीसगडमध्ये आपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षाने राज्यातील सर्व ९० जागांवर उमेदवार दिले आहेत.