News Flash

आपचा आमदार म्हणाला, “योगी की मौत सुनिश्चित हैं”; भाजपाकडून केजरीवाल यांना आव्हान, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये भाजपा विरुद्ध आप वाद शिगेला

(फोटो सौजन्य : आयएएनएस आणि पीटीआय)

उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध सत्ताधारी भाजपा असं राजकारण सध्या चांगलच तापल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आज आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर शाईफेक झाल्याने प्रकरण आखीनच तापलं आहे. रायबरेलीमधील सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊससमोर आज सकाळी भारती यांच्यावर भाजपा समर्थकांनी शाई हल्ला केल्यानंतर भारती चांगलेच संतापल्याचे पहायला मिळालं. जिल्ह्यांमधील रुग्णालयांची पहाणी करण्यासाठी आलेल्या भारती यांच्यावर शाईहल्ला झाल्याने त्यांनी रागाच्याभरात थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त व्क्तव्य केलं. त्यामुळेच आता ते पुन्हा चर्चेत आले आहे.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेशातील रुग्णालयामध्ये कुत्र्याची पिल्लं जन्म घेतात असं म्हणणाऱ्या ‘आप’च्या आमदाराला अटक

भाजपा आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी भारती यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर भारती आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळेस भारती हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ओरडले. “योगी की मौत सुनिश्चित हैं”, असं भारती यांनी पोलिसांवर ओरडतच म्हटलं. भारती यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

याच व्हायरल व्हिडीओवरुन भाजपाचे दिल्लीमधील प्रवक्ते खेमचंद शर्मा यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जाहीर आव्हान दिलं आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या आमदाराच्या वक्तव्याचं समर्थन करावं आणि त्याचे परिणाम भोगण्यास तयार रहावं अथवा तातडीने भारती यांना निलंबित करावं असं शर्मा म्हणाले आहेत. तसेच भारती हे एखाद्या आमदाराप्रमाणे वागत नसून एखाद्या डॉनप्रमाणे वागत आहेत, अशी टीकाही शर्मा यांनी ट्विटमधून केली आहे. इतकच नाही तर भारती यांच्यावर झालेला शाई हल्ला हा त्यांच्याच पापामुळे झाला आहे, असंही शर्मा म्हणालेत.

भारती यांना अटक

भारती यांनी उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांसंदर्भात दिलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना आज अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या आमदार असणाऱ्या भारती यांना अमेठी पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. भारती यांच्याविरोधात जगदीशपूर पोलीस स्थानकामध्ये कलम ५०५ आणि १५३ अ अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीशपूर पोलिसांनी भारती यांना रायबरेलीमधून अटक केली असून त्यांना दुपारच्या सुमारास अमेठीला आणण्यात आलं. शनिवारी भारती यांनी जगदीशपूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारती यांना अटक केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांना घेऊन जात असणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याचा आपच्या कार्यकर्ते पाठलाग केल्याचे समजते. भारती यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांमध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं वादग्रस्त वक्तव्य भारती यांनी केलं होतं.

काय म्हणाले होते भारती?

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारती यांनी अमेठीमध्ये शनिवारी कार्यकर्त्यांसमोर भाषण दिलं. यावेळी राज्यातील योगी सरकारच्या कारभारावर टीका करताना भारती यांच्या जीभेचा ताबा सुटला आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या बालकांची तुलना कुत्र्याच्या पिल्लांशी केली. “आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आलो आहोत. येथील शाळा आम्ही पाहिले. येथील रुग्णालये आम्ही पाहिली. परिस्थिती इतकी भयंकर आहे की इथल्या रुग्णालयांमध्ये मुलं तर जन्म घेत आहेत. मात्र कुत्र्याची मुलं जन्म घेत आहेत. अस्पतालों में बच्चे तो पैदा हो रहे हैं, लेकिन कुत्तों के बच्चे पैदा हो रहे हैं),” अशा शब्दात भारती यांनी टीका केली.

आप विरुद्ध भाजपा?

२०२२ साली राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आप उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वोसर्वा असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी मध्यंतरी केली. त्यानंतर आपचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशमध्ये खूपच सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमनाथ भारती रायबरेलीमध्ये पोहचले. भारती यांनी शाई फेकण्याच्या घटनेला भाजपा समर्थकांचे कारस्थान असल्याचं म्हणत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 4:24 pm

Web Title: aap leader somnath bharti said in front of police yogi death is sure bjp reacts scsg 91
Next Stories
1 जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
2 उत्तर प्रदेशातील रुग्णालयामध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं म्हणणाऱ्या ‘आप’च्या आमदाराला अटक
3 पंतप्रधान निधीतून भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना दोन लाखांची मदत जाहीर
Just Now!
X