आपच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी लोकसभेची उमेदवारी मिळताच आपले आडनाव बदलले. आतिशी मारलेना यांचे आडनाव ख्रिश्चन वाटते, त्यामुळे भाजपाकडून टीकेचा भडीमार होऊ शकतो. हा विचार करून आतिशी यांनी ट्विटर हँडलवरून आतिशी मारलेना या नावातले आडनाव वगळले आहे. असे असले तरीही आपने या प्रश्नी आम्ही त्यांना आडनाव बदलण्यास सांगितलेले नाही किंवा त्यांच्यावर यासाठी कोणताही दबाव आणलेला नाही हे स्पष्ट केले.
माझे मूळ आडनाव सिंग आहे, मात्र आता मी हा निर्णय घेतला आहे की मी आतिशी एवढेच नाव ट्विटरवर ठेवणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आतिशी मारलेना यांना आपने उमेदवारी जाहीर केल्यावर दिल्लीच्या पूर्व भागात ही अफवा पसरण्यास सुरूवात झाली की त्या विदेशी आहेत किंवा ख्रिश्चन आहेत. त्यांच्या एका निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार आतिशी यांच्या वडिलांचे नाव विजय सिंह आणि आईचे नाव तृप्ता आहे. मारलेना हे आडनाव त्यांना त्यांच्या आई वडिलांनी दिले आहे असेही आतिशी यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.
आतिशी मारलेना यांचे अधिकृत ट्विटर हँडल @Atishimarlena असे होते जे आता @AtishiAAP असे असणार आहे. आपच्या वेबसाइटवरही त्यांच्या नावात बदल करण्यात आला आहे. पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, प्रचार पत्रकांवरूनही आतिशी यांचे मारलेना हे आडनाव वगळण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 6:25 pm