बोगस पदवीवरून ‘आप’चे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना अटक झाल्यापाठोपाठ पत्नीने दिल्ली महिला आयोगात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याने ‘आप’च्या पहिल्या राजवटीतील कायदामंत्री सोमनाथ भारती हेदेखील गोत्यात आले आहेत. यामुळे ‘आप’चा पाय आणखी खोलात गेला असून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतानाच भाजपचीही कोंडी केली आहे.
सोमनाथ भारती माझा आणि माझ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचे त्यांची पत्नी लिपिका यांनी महिला आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सोमनाथ भारती यांना २६ जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी सांगितले. स्वत: विधिज्ञ असलेले भारती यांनी या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास प्रसिद्धी माध्यमांना नकार दिला असून ‘आप’ने हे प्रकरण व्यक्तिगत असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे घरगुती हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या लिपिका या गेल्या तीन वर्षांपासून भारती यांच्यापासून विभक्त राहात असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा सिंह यांनीच सांगितले. भारती आपल्या घरी येतात आणि धमकावतात, असा लिपिका यांचा आरोप आहे. मला या विवाहातून मुक्त व्हायचे आहे आणि प्रतिष्ठेने राहायचे आहे, असे लिपिका यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या घरातच महिला सुरक्षित नाहीत त्यांच्या राज्यात काय स्थिती असेल, असा टोला भाजपने लगावला. त्यावर स्वत:च्या पत्नीलाही न सांभाळणाऱ्या नेत्याचा आदर्श बाळगणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीच्या भाजपने याबाबतीत सक्रीय होणे हा काव्यगत न्याय असल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे.
इराणी, कथेरियांचे काय?
खोटय़ा प्रमाणपत्रावरून दिल्लीचे कायदा मंत्री तोमर यांच्यावर केंद्र सरकारने ज्या धडाडीने कारवाई केली, त्याच धडाडीने त्यांनी असाच गुन्हा करणारे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रामशंकर कथेरिया यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करून काँग्रेसने भाजपची कोंडी केली. इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेबद्दल चुकीची माहिती दिली होती तर कथेरिया हे गुणपत्रिकेतील खाडाखोडीच्या प्रकरणात अडकले आहेत. ‘आप’चे नेते आशुतोष यांनीही इराणींवर कारवाईची मागणी केली आहे.
केजरीवाल-जंग यांची भेट
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशी सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी जंग यांची भेट घेतली. एकमेकांमध्ये उत्तम समन्वय कसा राहील यासंदर्भात या वेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही उपस्थित होते.