आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी एक फोटो ट्विट करत उत्तर प्रदेशमधील करोनासंदर्भातील कामकाजावर निशाणा साधाला आहे. सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे करोनासंदर्भातील आढावा बैठकीमध्ये राज्यातील परिस्थितीसंदर्भात तपशील घेत असताना सरकारी अधिकारी टॅबलेटवर गेम खेळण्यात व्यस्त होते. “मी बरोबर म्हणालो होतो, योगींनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी नाही तर क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी टीम ११ बनवली आहे. पाहा योगीजी करोनासंदर्भातील बैठक घेत असताना त्यांचे प्रमुख सचिव मात्र व्हिडिओ गेम खेळत आहेत,” अशी कॅप्शन सिंग यांनी दिली आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी ११ वेगवेगळ्या समिती तयार केल्या आहेत. त्या ११ समित्यांच्या गटाला ‘टीम एलेव्हन’ असे नाव देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी रोज या टीम ११ च्या सदस्यांबरोबर बैठक घेऊन राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेत असतात. संजय सिंग यांनी पोस्ट केलेला फोटो हा टीम ११ च्या बैठकीदरम्यानचा असल्याचे सांगण्यात आलं आहे. यामध्ये योगी आदित्यनाथही सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकीला उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून तीन हजारहून अधिक जणांनी हे रिट्विट केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी यांनी प्रादुर्भाव झालेल्या ६ जिल्ह्यांमध्ये ११ अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे. अपर मुख्य सचिव असणाऱ्या मुकुल सिंहल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या नव्या निर्णयानुसार प्रयागराज, गोरखपुर, लखनऊ, कानपूर नगर, बहराइच आणि वाराणसीमध्ये विशेष सचिव स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरखपूरमध्ये एक नोडल अधिकारी असेल तर बाकी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन नोडल अधिकारी असतील.

उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या १ लाख २६ हजारहून अधिक झाली आहे. १० ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान राज्यात ४ हजार १९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर या २४ तासांमध्ये ५१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये करोनामुळे एकूण २१२० जणांचा मृत्यू झाला असून ४७ हजार ८७८ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ७६ हजार ७२४ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.