आम आदमी पक्षाजवळील (आप) पैसा संपला असून पक्षाच्या दररोजच्या कामकाजासाठी पैशाची गरज असल्याचे सांगत मंगळवारी अरविंद केजरीवाल यांनी जनतेसमोर ‘आप’ला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ‘आप’ला कोणत्याही चुकीच्या मार्गाने पक्षनिधी जमवायचा नाही. आम्हाला प्रामाणिकपणे राजकारण करण्याची शपथ मोडायची नसल्यामुळेच जनतेसमोर अशाप्रकारे मदतीचे आवाहन करावे लागत असल्याचे यावेळी केजरीवालांनी सांगितले. मात्र, अनेक देणगीदारांनी पाठ फिरवल्यामुळेच ‘आप’ अशाप्रकारे आर्थिक विवंचनेत सापडल्याची चर्चा आहे.
दिल्लीत सत्ताग्रहण करताना पक्षाकडे असलेला निधी आता संपला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या दररोजच्या कामासाठी पैशांची गरज असल्याचे केजरीवालांनी सांगितले. एक मुख्यमंत्री असूनही मी तुमच्याकडे पैसे मागतो, हे तुम्हाला अजब वाटेल. मात्र, ‘आप’ आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये हाच फरक आहे. मला चुकीच्या मार्गांनी पक्षनिधी जमवायचा असता तर, मला तुमच्यासमोर अशाप्रकारे आवाहन करावे लागले नसते. परंतु, मला चुकीच्या किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेला पैसा नको असल्याचे यावेळी केजरीवालांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी ‘आप’वर संशयास्पद रितीने निधी गोळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. मात्र, जनता आम्हाला पैसा पुरवते, त्यामुळे आम्ही कधीही कोणाकडून टेबलाखालून पैसे घेत नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. आम्ही जनतेला प्रत्येक पैशाचा हिशोब देतो. लोकांनी आम्हाला १० रूपयांची मदत केली तरी चालेल. कारण, त्यामुळे आमच्या प्रामाणिक राजकारण करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल, असेही यावेळी केजरीवाल यांनी सांगितले.