दिल्ली विधानसभा निवडणुकीत शीला दीक्षित सरकारला आव्हान देण्यासाठी उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची उमेदवार संतोष कोली ही तरुणी रविवारी एका अपघातात गंभीरपणे जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहेत. हा अपघात आहे की घातपात, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
रविवारी सायंकाळी गाझियाबादमधील कौशांबी मेट्रो स्थानकावर उतरून कुलदीप नावाच्या सहकाऱ्यासोबत त्याच्या मोटारसायकलवर मागे बसून जात असताना संतोष कोली हिला मागून वेगाने आलेल्या एका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कुलदीपही गंभीर जखमी झाला. धडक मारल्यानंतर कारचालक तात्काळ फरार झाला. संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाची सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ती असलेली संतोष कोलीला नुकतीच ईशान्य दिल्लीतील सीमापुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. एक आठवडय़ापूर्वीच तिला निवडणूक न लढण्याविषयी धमकीवजा फोन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यंदा मार्च-एप्रिल महिन्यात संतोष कोलीच्या घरासमोर बसूनच अरविंद केजरीवाल यांनी भरमसाट वीज बिलांच्या विरोधात १४ दिवसांचे उपोषण केले होते. सीमापुरी भागात संतोष कोली आम आदमी पक्षाच्या लोकप्रिय कार्यकर्ती म्हणून परिचित आहेत.