आम आदमी पक्षातर्फे (आप) शुक्रवारी गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांचा मदतनिधी देण्यात आला. केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्लीमध्ये शेतकरी सभा आयोजित केली होती. या सभेवेळी राजस्थानमधील गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने सभेच्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
‘आप’चे नेते संजय सिंह यांनी सिंह कुटुंबियांची भेट घेऊन हा मदतनिधी त्यांच्याकडे सुपूर्द केला आणि ‘आप’चे कार्यकर्ते तुम्हाला वाचविण्यासाठी प्रयत्न करतील, असे आश्वासनही दिले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी ‘आप’चे कार्यकर्ते सभास्थानी गजेंद्र सिंह यांना झाडावरून खाली उतरण्यासाठी कशाप्रकारे विनवणी करत होते, याची चित्रफीतही सिंह कुटुंबियांना दाखवली. यावेळी गजेंद्र सिंह यांना ‘किसान शहीदा’चा दर्जा देण्यात यावा आणि नवी दिल्लीत त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी सिंह कुटुंबियांनी केली. याशिवाय, गजेंद्र सिंह यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. ‘आप’ने या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत.
गजेंद्र सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणावरून अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मागितलेली माफी कोणत्याही कामाची नाही. त्याऐवजी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी सिंह कुटुंबियांनी केली.