दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यापासून तसंच भारत बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून दिल्ली पोलिसांनी त्यांना घरात नजरकैदेत ठेवल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे. पक्षाकडून ट्विट करत हा आरोप करण्यात आला आहे. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे.

“अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही तुमची सेवा करुन तसंच पाठिंबा देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेथून परतल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी बॅरिकेट्स लावले असून नजरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे,” असा आरोप आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

आणखी वाचा- नवे कृषी कायदे रद्द करू नका, हरयाणातील काही शेतकरी संघटनांचं कृषीमंत्र्यांना पत्र

आणखी वाचा- भारत बंद : जबरदस्तीने दुकाने, संस्था बंद केल्यास…; आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले निर्देश

“कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. तसंच केजरीवालांना बाहेर येण्याची परवानगी नाही. सोमवारी बैठकीसाठी काही आमदार त्यांना भेटण्यासाठी गेले असता पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. कार्यकर्त्यांनाही भेटू दिलं नाही. भाजपा नेत्यांना घराबाहेर बसवण्यात आलं आहे,” असाही आरोप त्यांनी केला आहे. यामुळे केजरीवाल यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती आपने दिली आहे.

दिल्ली पोलिस उपायुक्त आलोक कुमार वर्मा यांनी मात्र आपचे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आम्ही अलर्ट आहोत. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी रात्री ८ वाजता घर सोडलं आणि १० वाजता परतले. यामध्ये कुठेही समस्या नाहीये,” असं ते म्हणाले आहेत. “आम आदमी आणि इतर पक्षांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं नाही,” असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.