सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देताना आम आदमी पक्षाने पुढे केलेल्या अटी काँग्रेसने मान्य केल्यांनतरही अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकार्यामध्ये संभ्रम कायम आहे. एकीकडे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केंद्र सरकारला दिल्लीत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असताना आम आदमी पक्षाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबविले आहे. सत्तास्थापनेसाठी फेसबूक, ट्विटर, एसएमएसच्या माध्यमातून ‘आप’ दिल्लीकरांचे मत आजमवणार आहे. याशिवाय येत्या रविवारी रामलीला मैदानावर जाहिरपणे जनता दरबारात काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांच्या गाझियाबदमधील निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांच्यासह नऊ सदस्य उपस्थित होते. त्यानंतर विजयी उमेदवारांची बैठक घेण्यात आली. मात्र त्यावरही एकमत होवू शकले नाही. बैठकीनंतर बोलताना केजरीवाल म्हणाले की, जनतेने दिलेल्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जबाबदारीपासून पळत नाही.  सत्ता स्थापन करून नवा आदर्श घालून द्यावा, असे काही जणांनी सुचवले आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याविरोधात आपण प्रचारादरम्यान रान उठवले त्यांचे सहकार्य का घ्यावे, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष ७० विधानसभा मतदारसंघांत सभा घेवून लोकांची मते आजमवणार आहे.