दिल्लीत विषारी दारूकांड घडले असते तर प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिनीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती, असा हल्ला आम आदमी पार्टीचे (आप) ज्येष्ठ नेते आशुतोष यांनी प्रसिद्धीमाध्यमांवरच चढविला आहे.
विषारी दारू प्यायल्याने मुंबईतील बळींची संख्या वाढत असल्याबद्दल आशुतोष यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला. विषारी दारूकांडात अनेक जणांचा बळी गेला त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिनाचा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा आहे का, असा सवालही आशुतोष यांनी केला. दारूकांडापेक्षा योग दिनाचा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा असूच शकत नाही, असेही आशुतोष म्हणाले.
मुंबईतील दारूकांडात इतके बळी पडलेले असताना वाहिन्यांवर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही, ही आधुनिक पत्रकारिता आहे. दिल्लीत असे कांड घडले असते तर प्रत्येक वाहिनीने केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती, असेही आशुतोष म्हणाले.