आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवावा या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्यासह आंदोलनाला बसलेले उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची प्रकृती ढासळल्याचं वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतः केजरीवालांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.


लाैमिळालेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांच्या रक्तातील किटॉनची पातळी ७.४ पर्यंत पोहोचली आहे. सामान्यतः ही पातळी शून्य असायला हवी. ही पातळी २ पेक्षा जास्त असेल तरीही धोक्याचा इशारा मानला जातो. डॉक्टरांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन सिसोदियांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  यापूर्वी रात्रीतून दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृतीही ढासळली होती, सकाळी त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

आंदोलनाला वाढता पाठिंबा –
केजरीवाल यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. या आंदोलनाला आता भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेचीही साथ मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः अरविंद केजरीवाल यांना फोन केला होता, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केजरीवालांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय. मोदीविरोधक यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याशिवाय, सपचे अखिलेश यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, माकपचे सीताराम येच्युरी, तामीळनाडूतील नवे राजकीय नेते कमलहालन, आदींनी आपच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने मात्र ‘आप’विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.

आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवा, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा आणि गरीबांच्या घरी रेशन पोहोचवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी या केजरीवालांच्या मागण्या आहेत.