मोबाईलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये फेसबुकवर लाईव्ह केल्यानंतर आम आदमी पक्षाचे लोकसभेतील खासदार भगवंत मान अडचणीत सापडले आहेत. भाजप आणि इतर मित्रपक्षांनी या प्रकरणी भगवंत मान यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शुक्रवारी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेमध्येही सत्ताधारी सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करीत त्यावर चर्चा करण्याची आणि वरिष्ठ सभागृहाच्या भावना कनिष्ठ सभागृहापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. यावेळी राज्यसभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. भगवंत मान यांनी केलेल्या कृतीमुळे संसदेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर संसदेचे सदस्य म्हणून मिळालेल्या विशेष अधिकारांवरही गदा आल्याची भावना अनेक सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
भगवंत मान यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. पण हा विषय गंभीर असून, केवळ माफीने संपणार नाही. आपण सर्व पक्षांची चर्चा करून निर्णय घेऊ, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. भगवंत मान यांच्याविरोधात शुक्रवारी संसद भवन पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली.
कडेकोट सुरक्षा असणाऱ्या संसद भवनातील दृश्ये थेट समाजमाध्यमावर दिसल्यामुळे हा विषय गंभीर बनला. पण गुरुवारी या प्रकरणी भगवंत मान यांनी आपण काहीही चुकीचे केलेले नसल्याचे म्हटले होते. सत्ताधारी आणि विरोधी सर्वच सदस्यांनी या प्रकरणावरून भगवंत मान यांच्यावर टीका केल्यावर त्यांनीही शुक्रवारी थोडी नरमाईची भूमिका घेतली. जर लोकसभेच्या अध्यक्षांनी मला बोलावून मी चूक केलेली असल्याचे सांगितले, तर मी माफी मागेन, असे भगवंत मान यांनी म्हटले होते. सुमित्रा महाजन यांनी बोलावून घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या कृतीबद्दल माफी मागितली.
भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या तिकीटावर पंजाबमधून निवडून आले आहेत. त्यांनी संसदेतील चित्रण थेट सोशल मीडियावर लाईव्ह केल्यामुळे त्यांच्यावर गुरुवारपासूनच टीका होऊ लागली.