टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्या पत्नीने म्हणजेच आरती सेहवागने फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माझ्या व्यवसायातील भागीदारांनी माझ्या खोट्या सह्या करुन साडेचार कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप करत आरती सेहवागने ही तक्रार दाखल केली आहे.

आरतीने केलेल्या आरोपानुसार दिल्लीतल्या अशोक विहारमध्ये राहणाऱ्या रोहित कक्कडसोबत तिची व्यावसायिक भागिदारी होती. रोहित कक्कड आणि त्याच्या काही निकटवर्तीयांनी आपल्याला विश्वासात न घेता एका बिल्डर फर्मशी संपर्क केला. या फर्मला त्यांनी सांगितले की वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग आमच्यासोबत बिझनेस पार्टनर आहे.

रोहित कक्कड आणि त्याच्या निकटवर्तीयांनी या फर्मकडूनच साडेचार कोटींचे कर्ज घेतले आहे. रोहित आणि माझी जेव्हा व्यावसायिक भागिदारी झाली तेव्हा मला कल्पना दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे जाणार नाहीत हे मी स्पष्ट केलं होतं. मात्र या साडेचार कोटींच्या कर्जाबाबत मला काहीही माहित नाही. यासाठी माझ्या खोट्या सह्याही करण्यात आल्याचा आरोप आरती सेहवागने केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सगळ्या आरोपींविरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.