नवी दिल्ली : कन्या आरुषी व नोकर हेमराज यांच्या दुहेरी खूनप्रकरणात दंतवैद्य असलेल्या राजेश व नूपुर तलवार या दाम्पत्याच्या सुटकेविरोधातील अपिलावर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. न्या. रंजन गोगोई यांनी सांगितले, की या बाबत सीबीआय व हेमराजची पत्नी यांच्या अपिलावर सुनावणी केली जाईल.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला तलवार दाम्पत्याची खुनाच्या आरोपातून मुक्तता केली होती. न्या. गोगोई, न्या. नवीन सिन्हा व न्या. के. एम. जोसेफ यांच्या न्यायालयाने हे अपील दाखल करून घेत आहे व त्यावर सुनावणी केली जाईल असे जाहीर केले. सीबीआयच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता मनिंदर सिंग यांनी सांगितले, की हेमराज याच्या पत्नीनेही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने दोन्ही अपिलांवर एकत्र  सुनावणी करण्याचे मान्य केले.

चौदा वर्षांची आरुषी मे २००८ मध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत तलवार यांच्या नोईडा येथील निवासस्थानी तिच्या खोलीत सापडली होती. यात संशयाची सुई हेमराजवर होती तो बेपत्ता होता, पण त्याचा मृतदेह नंतर दोन दिवसांनी टेरेसवर सापडला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी अतिशय वाईट पद्धतीने तपास केल्याने मुख्यमंत्री मायावती यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे आले. सीबीआयच्या गाझियाबाद न्यायालयाने तलवार दाम्पत्यास जन्मठेपेची शिक्षा २६ नोव्हेंबर २०१३ रोजी दिली होती. उच्च न्यायालयाने नंतर त्या दोघांना आरोपमुक्त करताना नोंदीतील पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी ठरवता येणार नाही असे जाहीर केले होते. ८ मार्चला सीबीआयने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला हेमराजची पत्नी खुमकला बंजाडे हिने तलवार यांना सोडून देण्याच्या विरोधात अपील केले होते.