एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पुर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील २८ जिल्ह्यातील ३३ लाख नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसला आहे. आतापर्यंत ८५ जणांनी आपले प्राण गमावले असून एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे.

भारतीय हवामान विभागाने १६ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे अद्याप आसामसमोरचं संकट टळलेलं नाहीये. गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर, धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरुप,मोरीगाव, नागाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काही भागांत भुस्खळलानाचेही प्रकार घडले आहेत, ज्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

काझरिंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही या पुराचा फटका बसला असून काही प्राण्यांना या पुरात आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यातील लोकं मिळेल त्या साधनाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांनाही सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आसाम सरकारने १४ जिल्ह्यांमध्ये २०० पेक्षा जास्त रिलीफ कँपची सोय केली असून विस्थापीत झालेल्या नागरिकांना या कँपमध्ये ठेवण्यात येतंय.