पाकिस्तान कितीही दावे केली तरी तिथे कोणीही सुरक्षित नाही हीच खरी परिस्थिती आहे. शनिवारी पाकिस्तानचे हेच तालिबानी कृत्य समोर आले आहे. अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलीखील यांची मुलगी सिलसिलाचे अपहरण केल्यानंतर तिला क्रूरपणे वागणूक देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणानंतर काही तासांनी तिला सोडण्यात आले. शनिवारी हे प्रकरण उघडकीस आले. सोडण्यापूर्वी अपहरणकर्त्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने ही माहिती दिली आहे. या अपहरणमागे कोणती व्यक्ती किंवा गट आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

घरी जाताना करण्यात आलं अपहरण

यासंदर्भात माहिती देताना अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की १६ जुलै रोजी अफगाणिस्तानच्या राजदूतांची मुलगी सिलसिलाची घरी परतत होती. यादरम्यान काही लोकांनी तिचे अपहरण केले. अपहरणानंतर तिला काही तासांसाठी ओलिस ठेवले होते. या वेळी तिचा छळ करण्यात आला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडण्यात आल्यानंतर सिलसिलाला रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथेच तिला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले गेले. अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला या प्रकरणात कठोर कारवाई करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले

या घटनेनंतर अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला सुनावले आहे. यावेळी अफगाण दूतावासाच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासह तेथे उपस्थित सर्व अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुरक्षा आंतरराष्ट्रीय करार आणि तरतुदीनुसार करण्यास सांगितले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आलबेल नाही. एकीकडे अफगाण राष्ट्रपतींनी पाकिस्तानवर तालिबान्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याला स्पष्टपणे नकार दिला आहे.