बिहारमधील मधुबनी मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात (राजद) गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असतानाच गुरुवारी राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दिकी यांनी, आपणच मधुबनी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघात दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सिद्दिकी हे राजद विधिमंडळ पक्षाचे नेते असून काँग्रेसने पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद यांच्यासाठी त्या जागेचा आग्रह धरला असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र सिद्दिकी या जागेवरील दावा सोडण्यास तयार नाहीत.
सिद्दिकी राजदचे एक प्रमुख नेते असून गेल्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते, तर शकील अहमद तिसऱ्या क्रमांकावर होते. लोकसभेची २००९ ची निवडणूक राजद आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविली होती. शकील अहमद यांनी १९९८ आणि २००४ मध्ये मधुबनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र दोन्ही वेळी काँग्रेसने राजदशी आघाडी केली होती. कोणत्याही आघाडीच्या निकषांनुसार मधुबनी जागा राजदलाच मिळावयास हवी, असे सिद्दिकी म्हणाले.तथापि, काँग्रेसने मधुबनी मतदारसंघाचा आग्रह धरला तर या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी आणि अन्य ३९ जागांच्या वाटपाचा निर्णय घ्यावा, अशी सूचना आपण करीत असल्याचे सिद्दिकी म्हणाले.