जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षाचा अखेर सोमवारी सकाळी मृत्यू झाला. काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांपासून भाजपा नेते व कार्यकर्त्यांसह अन्य राजकीय नेत्यांवर दहशतवाद्यी हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जवानांकडून सुरू असलेल्या दशतवादविरोधी मोहिमांमुळे दहशतवादी अधिकच चवताळल्याचे यावरून दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल (रविवार)सकाळी दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा परिसरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ओबीसी आघाडी) अब्दुल हमीद नाजर यांच्यावर हल्ला केला होता,ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

रविवारी सकाळी जेव्हा हमीद फिरायला बाहेर पडले होते, तेव्हा त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. गोळीबारा केल्यानंतर घटनास्थळावरून दहशतवाद्यांनी पळ काढला. या नंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हमीद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांत भाजपा नेत्यांवर झालेला हा तिसरा हल्ला होता.

बडगाम पोलिसांच्या मते भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद एका सुरक्षित परिसरात राहत होते. मात्र, रविवारी सकाळी ते सुरक्षा रक्षकांना न सांगताच फिरण्यास बाहेर पडले तेव्हाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बडगाम रेल्वे स्थानकाजवळ गोळीबार केला. यानंतर त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. आतार्यंत या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.

भाजाप नेते व कार्यकर्त्यांवर दहशवाद्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाल्याचे दिसत आहे. या अगोदर ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेस्सु गावात भाजपाचे सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

अब्दुल हमीद यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भाजपाच्या चार नेत्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये बडगामचे सरचिटणीस आणि एमएम मोर्चा बडमगामचे सरचिटणीस यांचा समावेश आहे. या अगोदर देखील अनेक भाजपा नेत्यांनी राजीनामा सोपवलेला आहे. कुलगामच्या देवसर येथील भाजपाचे सरपंच, भाजपा नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसैन पाला यांनी राजीनामा दिलेला आहे. वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपात राजीनामा सत्र सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे.

जून पासून आतापर्यंत चार भाजपा नेत्यांवर हल्ला –
दहशतवादी विशेषकरून भाजपा नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत भाजपाच्याचार नेत्यांवर हल्ले झाले आहेत. जुलैमध्ये बांदीपोराचे माजी जिल्हाध्यक्ष वसीम बारी यांची त्यांच्या वडील व भावसाह हत्या करण्यात आली होती. यानंतर १५ जुलै रोजी सोपोर मध्ये भाजपा नेता मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र त्यांना दहा तासांतच सोडवण्यात आले होते. यानंतर ४ ऑगस्ट रोजी कुलगाममध्ये पंच पीर आरीफ अहमद शाह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आळी होती. ६ ऑगस्ट रोजी सज्जाद खांडे यांची हत्या करण्यात आली व काल अब्दुल हमीद यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ज्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.