महिलांवरील अत्याचारांत वाढ होण्यास महिलांबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत आहे, या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या वक्तव्याला दोन दिवस लोटतात न लोटतात तोच, त्यांचे पुत्र व काँग्रेसचे खासदार अभिजित मुखर्जी यांनी याच ‘संस्कृती’चे दर्शन घडवले. दिल्लीतील बलात्काराच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या महिला छचोर असल्याचे वादग्रस्त विधान अभिजित यांनी केले. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्ष व विविध महिला संघटनांबरोबरच खुद्द त्यांच्या बहिणीनेच जोरदार टीका केली आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली निदर्शने दिखाऊपणा असल्याची टीका अभिजित यांनी कोलकात्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केली. ‘आपण विद्यार्थी असल्याचे दाखवत येणाऱ्या या सुंदर सुंदर महिला कलंकित व भपकेबाज आहे. टीव्हीवर मुलाखती देणाऱ्या या महिला दिवसा निदर्शने करून रात्री पबमध्ये डिस्को करतात. या खरोखरच विद्यार्थी आहेत का, याबाबत मला शंका आहे. दिल्लीमध्ये जे घडतेय ते ‘गुलाबी क्रांती’प्रमाणे आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीशी त्याचा काडीमात्र संबंध नाही,’ असे अभिजित मुखर्जी म्हणाले.
अभिजित मुखर्जी यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि डाव्या पक्षांनीही जोरदार टीका केली. त्यातच घरचा आहेर मिळाल्यामुळे वठणीवर आलेल्या अभिजित यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मात्र केवळ माफीने काम भागणार नाही, अशी भूमिका महिला संघटनांनी घेतली आहे. ‘कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा विधानाबद्दल माफी मागून सुटका करून घेता येणार नाही. त्यांच्यासाठी एक आचारसंहिताच असली पाहिजे,’ असे माकपच्या वृंदा करात यांनी म्हटले. तर सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात, राष्ट्रपतींच्या मुलानेच अशी वक्तव्ये करणे खेदजनक आहे, अशा प्रकारच्या मानसिकतेविरोधातच हे आंदोलन सुरू आहे, असे भाजपच्या खासदार स्मृती इराणी म्हणाल्या. तर हीच काँग्रेसची मानसिकता आहे, असे सांगत भाजपने सरकारवर तोफ डागली.                          

कुटुंबात ही शिकवण नाही – शर्मिष्ठा मुखर्जी
अभिजित मुखर्जी यांचे हे वक्तव्य प्रसारित होताच, खुद्द त्यांची बहीण व राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा यांनी हे विधान ‘धक्कादायक व संतापजनक’ असल्याची टीका केली. ‘मला अत्यंत धक्का बसला आहे. देशातील प्रत्येक संवेदनशील महिला-पुरुषांची मी अभिजितच्या वतीने माफी मागते. माझ्या भावाने  ताबडतोब माफी मागितली पाहिजे. केवळ राष्ट्रपतींचा मुलगा म्हणून नव्हे तर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीने अशा प्रकारची वक्तव्ये करता कामा नयेत. माझे कुटुंब अशी शिकवण देत नाही,’ असे शर्मिष्ठा म्हणाल्या. आपले वडीलही अभिजितच्या या वक्तव्यावर संतापले आहेत, असेही त्या म्हणाल्या.