News Flash

नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची नौका सापडली, पुढच्या १६ तासात होणार सुटका

गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान जखमी झालेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची नौका भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाने शोधून काढली आहे

गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान जखमी झालेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची नौका भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाने शोधून काढली आहे. नौदलाचे पी८ आय विमान जेव्हा थुरिया बोटीवरुन जात होते त्यावेळी टॉमी यांनी इपीआयआरबी उपकरणाद्वारे पिंग करुन प्रतिसाद दिला. टॉमी यांच्या बचावाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून त्यांच्या पाठिला मार लागला आहे. फ्रेंच नौका ओसीरीस पुढच्या १६ तासात टॉमी यांच्यापर्यंत पोहोचेल असे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळे टॉमी यांच्या थुरिया या स्वदेशी बनावटीच्या नौकेचे नुकसान झाले व टॉमी जखमी झाले. टॉमी यांच्या बचावासाठी भारतीय नौदलाने आयएनएस सातपुडा आणि आयएनएस ज्योती या आपल्या युद्धनौकाही रवाना केल्या आहेत. नवी दिल्लीतील नौदल मुख्यालय आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील केंद्राबरोबर समन्वय ठेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

भारतीय नौदलाच्या पी ८ आय विमानाने मॉरिशेस येथून उड्डाण केले होते. अभिलाष टॉमी महासागरात जखमी अवस्थेत ज्या भागात आहेत तिथे पाऊस झाल्याचीही माहिती आहे. फक्त नौदलाच्या बोटीच्या मदतीनेच टॉमी यांची सुटका करता येऊ शकते. कमांडर टॉमी यांच्या बचावासाठी भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियाची संरक्षण दले, तसेच अन्य संस्था प्रयत्न करत आहेत. बचावकार्याचे नियोजन ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील केंद्रातून केले जात आहे.

गोल्डन ग्लोब रेस ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची आणि अत्यंत कठीण नौकानयन स्पर्धा आहे. यंदाच्या स्पर्धेला १ जुलै रोजी फ्रान्समधील ला सेब्ला दोलॉन येथून सुरुवात झाली. जगातील १८ खलाशी त्यात भाग घेत असून ते साधारण ३०,००० सागरी मैलांचा प्रवास करून फ्रान्समधील मूळ ठिकाणी परततील. स्पर्धकांनी कोणत्याही बाह्य़मदतीविना एकटय़ाने पृथ्वीप्रदक्षिणा करायची असते. कमांडर टॉमी यांनी यापूर्वी २०१३ साली समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत ८४ दिवसांत १०,५०० सागरी मैलांचा खडतर प्रवास करून कमांडर टॉमी हे तिसऱ्या स्थानावर होते. हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील प्रदेशात ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून साधारण १९०० सागरी मैल अंतरावर असताना त्यांना वादळाने गाठले. ताशी १३० किमी वेगाने वाहणारे वारे आणि १० मीटर उंचीच्या लाटांच्या तडाख्याने टॉमी यांच्या थुरिया या नौकेची (यॉट) डोलकाठी (मास्ट) तुटली आणि टॉमी यांच्या पाठीला इजा झाली.

स्पर्धेच्या संयोजकांनी फ्रान्समधून दिलेल्या माहितीनुसार आर्यलडचे ग्रेगर मॅकगुकिन आणि हॉलंडचे मार्क स्लॅट्स यांच्याही नौकांना वादळाचा तडाखा बसला. ताशी ७० नॉट्सच्या वेगाने वाहणारे वारे आणि १४ मीटर उंचीच्या लाटांनी ग्रेगर यांच्या नौकेचीही डोलकाठी तुटली आणि स्लॅट्स यांच्या नौकेला दोनदा मार बसला. मात्र ग्रेगर आणि स्लॅट्स या दोघांकडूनही ते सुरक्षित असल्याचा संदेश मिळाला आहे. स्लॅट्स हे स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर होते. टॉमी यांच्या थुरिया नौकेपासून ग्रेगर यांची नौका सर्वात जवळ म्हणजे ९० सागरी मैलांवर आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 7:56 pm

Web Title: abhilash tomy vessel located responded by ping
टॅग : Indian Navy
Next Stories
1 पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या प्रश्नावर लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले…..
2 गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच कायम राहणार : अमित शाह
3 माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन
Just Now!
X