काँग्रेसचे नेता आणि प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर प्राप्तीकर विभागाने कारवाई केली आहे. प्राप्तीकर विभागाच्या सेटलमेंट कमिशन (आयटीएससी)ने मागील तीन वर्षांपासूनचे त्यांचे ९१.९५ कोटींचे व्यावसायिक उत्पन्न कमी दाखवल्याप्रकरणी ५६.६७ कोटींचा दंड ठोठावला आहे. राजकीय फायद्यासाठी आपल्यावर आरोप केला जात असल्याचे स्पष्टीकरण सिंघवी यांनी याबाबत दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे त्यामुळे यावर जास्त चर्चा करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. परंतु भाजपने मात्र या संधीचा फायदा घेत सिंघवी यांच्यावर टीका केली आहे. प्राप्तीकर संबंधीचे कागदपत्रे हरवल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे. यावर भाजपचे प्रवक्ता सांबित पात्रा यांनी काँग्रेस पक्षाच हरवला असल्याची खोचक टीका केली.
हे संपूर्ण प्रकरण सिंघवी यांच्या २०१२ मधील प्राप्तीकर संबंधित आहे. प्राप्तीकर विभागासमोर खुलासा करताना सिंघवी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी मागील ३ वर्षांत ५ कोटी रूपये खर्च केल्याचे सांगितले. याचा अर्थ सिंघवी यांनी आपल्या १४ कर्मचाऱ्यांसाठी मागील ३ वर्षांत सुमारे ४० हजार रूपये किंमतीचे १२५० लॅपटॉप खरेदी केले आहेत. सिंघवी यांनी लॅपटॉप खरेदी केल्यामुळे प्राप्तीकरात ३० टक्क्यांची सूट मागितली होती. त्याचबरोबर २०१२ च्या डिसेंबर महिन्यात यासंबंधीचे कागदपत्रे गहाळ झाल्याचे त्यांनी प्राप्तीकर विभागाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे जमा करणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिंघवी यांचा हा खुलासा प्राप्तीकर विभागाला पटला नसून त्यांनी त्यांच्यावर ५६ कोटी ६७ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.