|| अभिषेक मनू सिंघवी

अरुण जेटली यांचे मैत्र हे खोलवरचे नाते सांगणारे, खेचून धरणारे तरीही बिनशर्त असेच. एक सुसंस्कृत, विनम्र ‘माणूस’ आपण गमावला आहे..

अरुण जेटली यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाविषयी दोन वृत्तपत्रांसाठी आज मी लिहिले आहे, पण या लेखात मी माणूस म्हणून त्यांचे वेगळेपण सांगणार आहे. आर्थिक बाबींची शिस्त त्यांनी नेहमी पाळली. ते त्याबाबत फार काळजी घेत असत, त्यामुळेच त्यांनी नेहमीच सरकारी खर्चातही काटकसर केली. नैनिताल येथे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या उद्घाटनासाठी ते कायदा मंत्री म्हणून आले होते. त्यासाठी ते सरकारी निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी उतरले होते. ते मंत्री होते, त्यामुळे ते या व्यवस्थेचे कुठलेही पैसे खरेतर देणे लागत नव्हते. पण तरी त्यांनी निवास व्यवस्थेचे किती पैसे झाले म्हणून विचारणा केली. संबंधिताला वाटले,की त्यांनी केवळ किती भाडे असावे या हेतूने चौकशी केली, त्यामुळे त्याने एका रात्रीचे दोनशे रुपये व सरकारी नोकरांसाठी १०० रुपये असे भाडे सांगितले. जेटली यांनी लगेच खिशातून तीनशे रुपये काढून दिले. त्यांचा जो मित्र बरोबर होता त्याचेही पैसे भरले,  नंतर त्यांची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीने सांगितले,की स्वत:च्या व मित्राच्या निवासाचे पैसे भरणारा कायदा मंत्री मी पहिल्यांदाच पाहिला.

जेटली यांच्या कार्यालयात ज्या व्यक्ती काम करीत असत त्यांची आर्थिक, नैतिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशी असेल तेवढी सगळी जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यांच्या निधनाने किमान २५ कुटुंबे अनाथ झाली आहेत असे मी म्हटले तरी अतिशयोक्ती समजू नका. आमच्या समान मित्राने मला असे सांगितले,की ते लंडनमध्ये असताना त्यांच्या कर्मचाऱ्याने त्यांच्या मार्क अँड स्पेन्सर ब्लेझरची तारीफ केली. जेटली हसले अन त्याला  लगेच दुकानात घेऊन गेले; त्यांचासारखाच ब्लेझर व टाय या कर्मचाऱ्याला घेऊन दिला. नंतर त्या कर्मचाऱ्याने हा ब्लेझर घातला तेव्हा अरूण जेटली त्याला म्हणाले, की  राजू अब बन गया जेंटलमन. वकील म्हणून त्यांच्या कार्यालयात जो पैसा येत होता त्यातून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली, त्यांच्या मुलांची शिक्षणे केली; अगदी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले. स्वत:च्या मुलांसाठी जे केले ते त्यांनी इतरांच्या मुलांसाठीही केले. त्यांनी त्यांच्या जीवनात आनंदाची अन आशेची पेरणी केली.

चवदार अन्नपदार्थ व जुने चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. ‘वक्त’ हा त्यांचा आवडता चित्रपट. परदेश वास्तव्यात एकदा डुब्रोवनिक येथे क्रूझ थांबले असता त्यांचे कुटुंबीय शहर बघण्यासाठी गेले, पण अरुण जेटली मागेच राहिले. त्यांनी ‘वक्त’ पाहिला. पंजाबी विनोदी चित्रपट ते आवडीने बघत. त्यांच्या खवय्येगिरीच्या आठवणी तर भरपूर आहेत. सर्वणा भवन हे व्हँकुव्हरमधील दाक्षिणात्य अन्नपदार्थाचे हॉटेल शोधण्यात त्यांनी तीन तास घालवले होते. पुढील दिवशीचे दुपारचे जेवण, न्याहारी हे सगळे ते आधीच ठरवत असत. एकदा ते न्यूयॉर्कमधील मिशेलीन या प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेले, तेथे त्यांना लिंबाचे लोणचे व हिरवी मिरची सापडली नाही म्हणून ते तेथून निघून गेले. पण नंतर त्या हॉटेलचा मालक व जेटली मित्र झाले. त्यांनी अनेक अन्नपदार्थ त्याच हॉटेलमध्ये चवीने अनुभवले. झुरीच ते लॉसेन हा पाच तासांचा प्रवास, पण त्यांनी सरदारजीकडून त्यांना पाहिजे ते अन्नपदार्थ आणण्यासाठी दुसऱ्यांदा प्रवास केला होता. लॉसेनमध्ये चांगले भारतीय अन्नपदार्थ हे सरदारजी देत असत.

त्यांचे मैत्र हे खोलवरचे नाते सांगणारे, खेचून धरणारे तरीही बिनशर्त असेच. वकिलांच्या बारमधील  एकदा त्यांचा एक जुना  मित्र आजारी असल्याचे त्यांना कळले. त्या वेळी मंत्री असताना त्यांनी सगळे सोडून मुंबईतील रुग्णालय गाठले, ते तेथे त्याच्याजवळ बसून होते. अनेक कामे असताना त्यांनी हा वेळ काढला. त्यांनी त्याच मित्राचा मोबाइल घेऊन फोन कॉल्सला उत्तरे दिली. नंतर या मित्राचे डोळे हे सांगताना भरून न येते  तरच नवल.

एक सुसंस्कृ त , विनम्र ‘माणूस’ आपण आज  गमावला आहे. विशाल मनाचा,कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस , उत्तम वक्ता, उत्तम संवादक, युक्तिवादपटू वकील, पक्षाचा आधारस्तंभ अशी कितीही विशेषणे त्यांना अपुरीच पडावीत!

( लेखक हे खासदार, काँग्रेसचे प्रवक्ते. संसदीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत, ही मते त्यांची व्यक्तिगत आहेत.)