भारतीय जनता पक्षाने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० के पार’ ही नवी घोषणा तयार केली आहे. भाजपाने यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय मिळवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०० जागांचं टार्गेट ठेवलं आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती.

‘ज्याप्रकारे मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत काम केलं आहे ते पाहता जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचं आहे. १९८४ नंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झालं होतं. भाजपाचं सरकार स्थापन झाल्यानंतरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० चा आकडा सहज पार करेल’, असा विश्वास भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कोणताही परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही असं म्हटलं. ‘लोकांना कळून चुकलं आहे की काँग्रेस फक्त खोटं बोलतं आणि दिलेली आश्वासनंही पूर्ण करत नाही’, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे.

‘२०१४ मध्ये लोकांनी आमचं काम पाहिलं नसतानाही फक्त मोदींवर विश्वास ठेवत २८२ जागा दिल्या होत्या. मात्र आता लोकांसमोर नरेंद्र मोदींचं काम आहे. यावेळी भाजपा लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचा नवा रेकॉर्ड करणार’, असंही अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abki bar 400 ke par bjp new slogan
First published on: 01-02-2019 at 02:54 IST