इराकमध्ये सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यांत किमान २९ नागरिक ठार, तर अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
धि क्वार प्रांतातील एका प्रसिद्ध उपाहारगृहात एका हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवल्यामुळे स्फोटात किमान १४ जण ठार, तर २७ जण जखमी झाले. याच वेळी बसरा शहरातील व्यावसायिक भागात एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या मोटारीचा स्फोट घडवून आणल्यामुळे किमान ५ जण ठार, तर १० जण जखमी झाले. यात ३० मोटारींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्या हल्ल्यात पहाटेच्या सुमारास आत्मघातकी हल्लेखोराने आपली स्फोटकांनी भरलेली मोटार बगदादमधील सद्र अल-कनात या उपनगरातील सुरक्षा तपासणी नाक्यात घुसवल्याने सहा सैनिक ठार, तर १३ जण जखमी झाले. याशिवाय आणखी एका आत्मघातकी कारबॉम्ब हल्लेखोराने बगदादपासून ३० किलोमीटर अंतरावरील मिशाहदा शहरात निमलष्करी दलाचे मुख्यालयात केलेल्या स्फोटात ४ जवान ठार झाले.