देशभरात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. टाळेबंदी सुरू होण्याआधी ३ टक्क्यांवर असणारे प्रमाण आता ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्लीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त म्हणजे ६६ टक्के आहे. बरे झालेले रुग्ण व उपचाराधीन रुग्ण यांच्यातील फरकही विस्तारत असून तो आता १ लाख २० हजार आहे.

देशभरात करोना रुग्णांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १८ हजार ५२२ रुग्णांची भर पडली. ३ लाख ३४ हजार ८२२ रुग्ण बरे झाले असून दिवसभरात १३ हजार ९९ रुग्णांची वाढ झाली. उपचाराधीन रुग्ण २ लाख १५ हजार १२५ इतके आहेत. एकूण १६ हजार ८९३ रुग्ण दगावले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ४१८ मृत्यू झाले.

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये देशातील ८५.५ टक्के करोनाचे रुग्ण आहेत. त्यातही महाराष्ट्रानंतर आता पुन्हा तमिळूनाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात दिल्ली दुसऱ्या स्थानावर होती. तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या ८६ हजार २२४ झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या ८५ हजार १६१ झाली आहे.

देशभरात १०४९ वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून ७६१ सरकारी व २८८ खासगी आहेत. प्रतिदिन २ लाखांहून अधिक नमुना चाचण्या केल्या जात असून एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ चाचण्या झाल्या आहेत.