देशात २०१३ या सालात महिला छळवणुकीच्या दाखल झालेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास ९ टक्के तक्रारी खोट्या किंवा चुकीच्या असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. संसदेत शून्यकाळात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात हरिभाई चौधरींनी नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या आकडेवारीचा दाखला देत यासंबंधीची माहिती दिली. ते म्हणाले की, “२०१३ सालात पती किंवा कुटुंबियांकडून महिलेचा छळ झाल्याच्या भारतीय दंड संहितेच्या ‘सेक्शन ४९८अ’ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची संख्या १,१८,८६६ इतकी होती. तर, त्याआधी २०१२ मध्ये ही संख्या १,०६,५२७ तर २०११ मध्ये ९९,१३५ इतकी होती. मात्र, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर २०१३ सालच्या एकूण तक्रारींपैकी १०,८६४ तक्रारी खोट्या किंवा गैरफायदा घेण्यात आल्याचे समोर आले. हेच प्रमाण २०१२ आणि ११ साठी अनुक्रमे १०,२३५ आणि १०,१९३ इतके आहे.”
या प्रकरणी भारतीय कायदा आयोगाने देखील आपल्या दोन अहवालांत ‘सेक्शन ४९८अ’ च्या तक्रारी न्यायालयाच्या परवानगीने परस्पर सामंजस्याने निकाली काढण्याची शिफारस केली असल्याचेही चौधरी म्हणाले.
याच मुद्द्याला अनुसरून एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी छळवणुकीच्या तक्रारी (सेक्शन ४९८अ) परस्पर सामंजस्याने निकाली काढता येण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र, असे करत असताना छळवणूक झालेल्या महिलेला योग्य न्याय मिळेल याचीही खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचेही राजनाथ पुढे म्हणाले.