मान्सून या वर्षी ६ जून रोजी केरळ दाखल झाला. त्याला पुढे मुंबईपर्यंत यायला दहा दिवस लागले. पण मान्सूनच्या आगमनासोबत अनेक प्रश्नही उपस्थित होतात.
मान्सून आला म्हणजे नेमकं काय?
मान्सून म्हणजे मोसमी वारे. ते दरवर्षी विशिष्ट काळात भारताकडे येतात आणि काही काळानंतर माघारी परततात. त्यांचा भारतात असण्याचा काळ म्हणजे आपला पावसाळा. या काळात मान्सूनमुळे पाऊस पडतो. भारतातील पावसाच्या अंदाजाची सुरुवात १८८२ साली झाली. हवामान विभागाचे तेव्हाचे मुख्य अधिकारी एच.एल. ब्लनफोर्ड यांनी पहिला अंदाज दिला. त्यासाठी एकच घटक वापरण्यात आला होता- हिमालयातील हिमवृष्टीचे प्रमाण. हिमवृष्टीचे प्रमाण जास्त असेल तर पावसाचे प्रमाण कमी राहील आणि हिमवृष्टी कमी असेल, तर पावसाचे प्रमाण जास्त राहील. असा त्यांचा आडाखा होता. पुढच्या काळात या पद्धतीत सातत्याने बदल होत गेले.
मार्गातील अडथळे –
१. वाऱ्यांचा जोर कमी होणे,
२. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणे. असे वादळ निर्माण झाले आणि ते भारताच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आफ्रिका खंडाच्या दिशेने गेले, तर सर्व बाष्प घेऊन जाते. त्यामुळे आपल्याकडील मान्सूनची पुढे सरकण्याची प्रक्रिया थांबते. या वर्षी हेच पाहायला मिळाले. ‘नानौक’ नावाचे वादळ असेच अरबी समुद्रात निर्माण झाले. त्यामुळे तो महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पुढे सरकलाच नाही. अजूनही त्याचा पुढे सरकण्याचा वेग फारसा नाही.

मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यापूर्वी तपासावयाचे निकष
१. पाऊस-
केरळमधील १४ प्रातिनिधिक ठिकाणे निवडली आहेत. ही ठिकाणे- मिनिकॉय, अमिनी, कोल्लम, तिरुअनंतपूरम, पुनालूर,अलपुझा, कोट्टायम, कोची, त्रिसूर, कोढीकोड, थलसेरी, कन्नूर, कुडुलू, मंगळूर. यापकी आठपेक्षा जास्त ठिकाणी सलग दोन दिवस २.५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडावा लागतो.
२. वाऱ्याचा पट्टा-
पश्चिमेकडून येणारे वारे विषुववृत्त्पासून काही अंतरावर विशिष्ट उंचीपर्यंत (६०० एच.पीए.) सक्रिय असावे लागतात. तसेच विशिष्ट पट्टय़ात त्यांचा वेग ताशी २७ ते ३६ किमी इतका असावा लागतो.
३. बाहेर जाणारे किरण-
केरळच्या परिसरात बाहेर पडणाऱ्या दीर्घ तरंग-लांबीच्या किरणांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपेक्षा (२०० डब्ल्यू प्रति चौरस मीटर) कमी असावे लागते.

पावसाच्या अंदाजाची गोष्ट :
मान्सूनच्या काळात देशभर किती पाऊस पडेल, याचा अंदाज दोन टप्प्यात दिला जातो. त्यासाठी एकूण आठ घटकांचा आधार घेतला जातो. पहिल्या टप्प्याचा अंदाज एप्रिलमध्ये देतात. त्यासाठी पाच निकष वापरले जातात. त्यानंतरचा अंदाज जूनमध्ये दिला जातो. त्यात सहा निकष वापरतात. ते असे
* उ. अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान
* विषुववृत्तावरील आग्नेय हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान
* पूर्व आशियाचे सरासरी तापमान
* वायव्य युरोपच्या पृष्ठभागाजवळील हवेचे तापमान
* विषुववृत्तावरील प्रशांत महासागराच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील उष्ण पाण्याचे प्रमाण
* मध्य प्रशांत महासागरातील निनो ३.४ या भागातील पृष्ठभागाच्या तापमानाचा कल
*  उत्तर अटलांटिक महासागराचा मे महिन्यातील पृष्ठभागावरील सरासरी दाब
* उत्तर-मध्य प्रशांत महासागरावर १.५ किलोमीर उंचीवरील मे महिन्यातील वारे