आयसिसच्या म्होरक्या अबु बक्र अल बगदादीने मोसूलमधून आपला तळ हलवला आहे. दोन महिन्यांपूर्वी बगदादीने मोसूलमधून पळ काढल्याचे वृत्त द इंडेपेंडंटने दिले आहे. मोसूलमधून जाण्यासाठी बगदादीने १७ आत्मघातकी कारबॉम्बचा वापर केल्याचे म्हटले गेले आहे. कुर्दिश अध्यक्ष मसूद बारझनीने द इंडपेंडंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. मोसूलमध्ये बगदादीला असुरक्षित वाटत होते त्यामुळेच त्यांनी त्याचा तळ हलवला असल्याचे त्यांनी म्हटले. इराकी सैन्याने पूर्व मोसूलमध्ये हल्ले केले. त्यामध्ये आयसिसचे ३०० दहशतवादी ठार झाले आहेत.  पलायन करण्यासाठी आयसिसने मोसूलच्या पश्चिमेकडील मार्ग पत्करला. या मार्गामध्ये हशद अल शाबी या गटाचे वर्चस्व होते. परंतु आयसिसने आत्मघातकी कारबॉम्ब वापरल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून जाऊ देण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरला नसल्याचे बारझनी यांनी म्हटले.

मोसूलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संघर्षाचे प्रमाण वाढले असते. जर त्या हल्ल्यात बगदादी सापडला असता तर आयसिसला मोठा झटका बसला असता. त्यामुळेच तेथून हलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसिसने बगदादीचे पलायन यशस्वी करुन दाखवल्यामुळे त्यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. २०१० ला आयसिसची धुरा बगदादीने सांभळली. त्यानंतर चार वर्षातच आयसिने मोसूलवर ताबा मिळवला. अद्यापही मोसूलवर आयसिसचाच ताबा आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयसिसला या भागातून नेस्तनाबूत केले जाईल. सध्या मोसूलची लोकसंख्या ४ लाख आहे. या भागातून निघून गेल्यानंतर आयसिस गनिमी काव्याचा वापर करण्याची शक्यता आहे असे बारझनी यांनी म्हटले. आयससिचा पडाव झाल्यानंतर या भागात कशी शांतता स्थापित करायची किंवा त्या ठिकाणची प्रशासन व्यवस्था कशी राहील याचा आढावा अद्याप इराकने घेतला नसल्याचे बारझनी यांनी म्हटले. तत्कालीन हुकूमशाह सद्दाम हुसैनच्या मृत्यूनंतर अनेक दहशतवाद्यांचे गट अचानकपणे सक्रीय झाले. आयसिसचा उदय याच काळातील. आयसिसने इराक आणि सिरिया या भागात दहशत पसरवली तर आहेच तसेच त्यांचा विस्तार हळुहळु जगभर होत आहे.