कोलकाता : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी सायंकाळी झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम बंगाल शाखेने केली असून, ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जाऊ शकते असे म्हटले आहे.

हा संघर्ष ‘दुर्दैवी’ असल्याचे सांगून, हा हिंसाचार हे जेएनयूतील परिस्थिती अस्थिर करू इच्छिणाऱ्या डाव्या शक्तींचे कारस्थान असल्याचा आरोप अभाविपच्या राज्य शाखेचे अध्यक्ष सप्तर्षी सरकार यांनी केला.

चेहरे झाकून घेतलेल्या आणि काठय़ा व लोखंडी कांबींनी सज्ज असलेल्यांनी रविवारी विद्यापीठाच्या परिसरात जो धुमाकूळ घातला, त्यात ३५ हून अधिक विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले होते. डाव्यांचे वर्चस्व असलेली जेएनयू विद्यार्थी संघटना आणि अभाविप यांनी या हिंसाचारासाठी एकमेकांना दोष दिला आहे. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

‘जेएनयूमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे, मात्र घटनाक्रमात स्पष्टतेचा अभाव आहे. त्यामळे या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी करतो’, असे सरकार पत्रकार परिषदेत म्हणाले. हा तपास कोण करेल असे विचारले असता, ‘अतिशय उच्च स्तरावरील कुठल्ही सक्षम यंत्रणा ती करू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीही तो होऊ शकतो’, असे त्यांनी सांगितले.

शुल्कवाढीला विरोध करण्याच्या नावाखाली जेएनयूमधील परिस्थिती अस्थिर करण्याकरता डाव्या शक्तीच या हिंसाचारामागे आहेत, अशी आमची खात्री आहे. ज्या ठिकाणी त्यांच्या संघटना आहेत, अशा जेएनयू व जादवपूरसारख्या इतर विद्यापीठांमधील शैक्षणिक वातावरण ते दूषित करू इच्छितात, असा आरोप सरकार यांनी केला.

अहमदाबादमध्ये अभाविप आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) यांच्यात मंगळवारी झालेल्या संघर्षांच्या संबंधात, दंगल माजवल्याच्या व हल्ला केल्याच्या आरोपाखाली या दोन्ही संघटनांच्या किमान २५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला. जेएनयू हिंसाचाराबाबत एनएसयूआयने पालडी भागातील अभाविपच्या कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर झालेल्या या संघर्षांत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जखमी झाले होते.

विद्यापीठ प्रशासन, पोलीस यांच्या संगनमतामुळेच जेएनयूत हिंसाचार

शिक्षक संघटनेचा आरोप

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेला हिंसाचार विद्यापीठ प्रशासन व दिल्ली पोलीस यांच्यातील साटय़ालोटय़ाशिवाय शक्य नव्हता, त्यामुळेच हिंसाचार होत असताना पोलीस निष्क्रिय राहिले असा आरोप जवाहरलाल नेहरू शिक्षक संघटनेने बुधवारी केला आहे.

संघटनेने कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्यावरही टीका केली असून झाले गेले विसरून पुन्हा विद्यापीठ आवारात परतण्याच्या विद्यार्थ्यांना  केलेल्या आवाहनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर सुरक्षितता नसेल, तर विद्यार्थी वसतिगृह किंवा वर्गात कसे परतणार. शिक्षक सुरक्षितता नसताना पुन्हा शिकवायला कसे जाणार असे संघटनेने म्हटले आहे. प्रशासकीय दहशतवाद स्वीकारा असे सांगण्याचा प्रयत्न एकप्रकारे कुलगुरूंनी केला आहे, असे सांगून शिक्षक संघटनेने म्हटले आहे, की या हिंसाचारात जे जखमी झाले त्यांचा हा अपमान आहे.  जमावाचा हिंसाचार हा पोलीस व विद्यापीठ प्रशासन यांच्या साटय़ालोटय़ाशिवाय होऊ शकत नाही.

तोंडाला फडकी बांधलेल्या सशस्त्र जमावाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून  लोखंडी गज व काठय़ांनी हल्ला केला होता. त्यात रविवारी ३५ जण जखमी झाले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष हिचा त्यात समावेश होता.